नैतिकता जिवंत ठेवायला माणूस शेरदील असला पाहिजे…!!
माझा मुलगा अन् नातवाने चोरी केली, साहेब.. गुन्हा नोंदवा..!! चित्रपटातील कथानक वाटावे अशी ही घटना आहे बीड जिल्ह्यातील चुंबळी (ता. पाटोदा) गावातली… दैनिक पुण्य नगरी मध्ये बातमी आली अन् अजूनही नैतिकता नावाचा शब्द अन् मर्म जिवंत असल्याचं दिसलं..

मंगळवार दि.४ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. पाटोदा तालुक्यातील एकेकाळचे आदर्श आणि सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहणारे चुंबळी हे गाव.. येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प. पांडुरंग गोविद पवळ हे कीर्तन, प्रवचन, व्याख्यानासाठी सतत व्यस्त आणि प्रवासात असतात.. हीच संधी साधून त्यांचा मुलगा आणि नातू गावच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या साहित्याची चोरी करून घरी लपवून ठेवत होते..
ह.भ.प पांडुरंग पवळ यांना मुलाच्या आणि नातवाच्या या कृत्याची काहीच माहिती नव्हती, गावातील काही शेतकरी ग्रामस्थ वारकरी असलेल्या पवळ यांच्या घरी गेले. त्यांनी घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. यानंतर पांडुरंग पवळ यांनी आपल्या घरामध्ये पाहणी केली आणि चोरून आणलेले साहित्य आढळून आले…

खिन्न मनाने पवळ यांनी गावकऱ्यांना माझ्यासह मुलगा आणि नातवाविरुद्ध गुन्हा दाखल करा.. मी माझ्या मुलाला आणि नातवाला चांगले संस्कार देऊ शकलो नाही, याच प्रायश्चित्त मला मिळेल.. शिवाय गुन्हेगारास शिक्षाही होईल, असे सांगितले.. यानंतर शेतकरी आपापले साहित्य घेऊन गेले.. मात्र पोलिसात तक्रार केली नाही….
दैनिकांत छापून आलेली चौकट खूप बोलकी आहे…👇
अन् पोलीसही चकित झाले…
शेतकरी आपआपले साहित्य घरी घेऊन गेले खरे, मात्र ह.भ.प पांडुरंग पवळ यांच्या भावना दुखू नयेत म्हणून पोलिसात तक्रार केली नाही.. या पाहून व्यथित झालेल्या पांडुरंग पवळ यांनी स्वतः थेट पाटोदा पोलीस ठाणे गाठले चोरी करणाऱ्या मुलाविरुद्ध आणि नातवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एकीकडे बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या होते..
त्यातील आरोपींना वाचविण्यासाठी प्रतिमोर्चे निघतात. पोलीस ठाण्यात लोक ठिय्या देतात, तर दुसरीकडे आपल्या मुलाने, नातवाने चोरी केली हे सांगायला स्वतः आजोबा पोलीस ठाण्याची पायरी चढतात, ही कौतुकास्पद गोष्टही याच बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने पोलीसही चकित झाले… नैतिकता जिवंत ठेवायला माणूस शेरदिल असला पाहिजे हे कुणाचही काम नाही..! आपला तो बाबू म्हणून त्याच्या चुका नजरेआड करून जमत नसतं..
धनंजय गुंदेकर बीड
096890 43949