५१ % नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन घरात अन् विक्रीची तारीख उद्या संपणार..! तारीख वाढणार का?
राज्यात व बीड जिल्ह्यात सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग संथ आहे. तसेच मागील दोन आठवडे बारदाण्याच्या तुटवड्यामुळे खरेदी रखडली होती. आता खरेदी सुरू असली तरी अंतिम मुदतीला केवळ १ दिवस शिल्लक आहे. परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ५१ टक्के शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे.
तर ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली आहे, त्यांचे पेमेंट अद्यापही थकीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी आणि खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पेमेंट तातडीने जमा करावेत, अशी मागणी सोयाबीन उत्पादक करत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारात विकलं आहे, अशा शेतकऱ्यांना तातडी भावांतर योजनेतून प्रतिक्विंटल दोन हजारांची भाव फरक द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात मॉन्सूनने शेतकऱ्यांना साथ दिली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा होती. परंतु आवकेच्या हंगामापासून सोयाबीन हमीभावाच्या खाली राहिले. त्यामुळे केंद्र सरकारने ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला. परंतु सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीला विघ्न लागलेली आहेत. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने १२ जानेवारीपर्यंत करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. राज्यात एकूण १४ लाख १३ हजार टनांच्या खरेदी उद्दिष्टापैकी २५ जानेवारीपर्यंत ७ लाख ८१ हजार ४४७ टन सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती रावल यांनी दिली आहे.