नाशिकच्या शेतकऱ्याला बीडच्या रेशीम कोष खरेदी केंद्रात ७८ हजार प्रति क्विंटल मिळाला भाव..!
सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे शेतकऱ्याकडून स्वागत – संचालक धनंजय गुंदेकर
बीड(प्रतिनिधी):- छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी विक्रमी भाव रेशीम कोषास लागलेला असून नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या येसगाव बुद्रुक येथील हिराबाई राजू महाले यांना ७८ हजार प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला. हा रेशीम कोष खरेदी केंद्रातील विक्रमी असा भाव असून याबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्र हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे अन शेतकऱ्यांच्या पसंतीचे केंद्र बनलेले असून या केंद्रात राज्यभरातून कोष विक्रीसाठी शेतकरी येतात. गेल्या काही दिवसांपासुन शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर मिळत असून ७० हजार रुपयांपेक्षा अधिकच दर शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा कोसला असल्यानंतर मिळतो. आज या केंद्रावर हिराबाई राजू महाले यांना ७८ हजार प्रति क्विंटल प्रमाणे १०७. ४ किलो तसेच राधाबाई गहिनीनाथ मुंडे (चारदरी) ७५ हजार रुपये, प्रती क्विंटल भाव लागलेला असून त्यांनी ९७.८ किलो कोष आवक होती तर सुभाष पंडित शेळके येसगाव बु तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना ७७ हजार रुपये भाव मिळाला असून त्यांचा १ क्विंटल ८४ किलो कोसला होता. सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे शेतकऱ्याकडून स्वागत होत असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
