शेतकऱ्यांचं मरण स्वस्त अन् जगणं महागलं..काल मध्यरात्री ३ वाजता अनोळखी क्रमांकावरून २ वेळा फोन आला. पहिल्यांदा जाऊद्या म्हटलं चुकून केला असेल, मात्र इतक्या रात्री फोन उगाच कुणी करणार नाही म्हणून नंबर ट्रू कॉलर वर सर्च केला. तो क्रमांक चंद्रकांत घीगे यांचा दाखवत होतं. व्हॉट्सअँप मध्ये जाऊन सर्च केल्यावर हा नंबर शेतकऱ्यांसाठी मी बनवलेल्या ग्रुप मध्ये असल्याचं दिसलं अन् दुसऱ्याच क्षणी फोन लावला. तिकडून भयभीत अन् दुःखी आवाज आला. झटकन मनात आलं काहीतरी वाईट घडलंय.. त्यांनी सांगितलं “धनु भाऊ..विजेच्या शॉक लागून आमच्या गावचा एक तरुण शेतकरी जाग्यावर गेला आहे.. काहीच कळेना, कुणाला फोन करावा, पुढं काय करावं? म्हणून तुम्हाला फोन लावत होतो…”
३३ वर्षांचा तरणाबांड शेतकरी विजेच्या धक्क्याने चिखलात जिवाच्या आकांताने हालचाल करून कायमचा शांत झाला होता.. शेतकऱ्याच जगणं किती जोखमीचं आहे राव.. कधी सर्पदंश, कधी अपघात, कधी विषबाधा, तर कधी डुकरांचा हल्ला, बिबट्याचा हल्ला, पाळीव जनावरांचा हल्ला, वीज पडून मृत्यू, ट्रॅक्टर खाली चिरडून तर कधी यांत्रिकी अपघात सह अशा नानाविध गोष्टी शेतकऱ्यांचा जीव घ्यायला टपल्या आहेत. हेच कमी होतं म्हणून आता पिकाला भाव नाही, दुष्काळ, चोरी, दरोडेखोरी, लुटमार, मापात पाप अन् बँक तसेच खाजगी सावकारकीचा ताप ह्या घटना जिवंतपणी मरतात..
शॉक लागून सोनगावचा शेतकरी गेल्याचं कळल्यापासून झोप आली नाही.. त्याच्या जागी उद्या आपणही असू शकतो, आपला भाऊ असू शकतो, आपला उसाला पाणी देणारा बापही असू शकतो.. हे समोर दिसल्यावर आज त्याची बारी उद्या आपली बारी त्यात दिसते..कुणी म्हणेल आता सौर पंप आहेत, ते बसवा अन् भरणं करा, ते म्हणायला सोप्पं आहे मात्र त्याला मंजूर करून सुरू होईपर्यंत अन् शेतात पाणी येईपर्यंतची आर्थिक स्थिती आहे का शेतकऱ्यांची? तेवढं पाणी तरी जमिनीत आहे का आपल्या? असे अनेक प्रश्न पुढे आहेतच..!!
सोलारही असलं तरी त्या डुकरांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतात जो हैदोस घालायला सुरुवात केली आहे त्याला आळा घालायचा म्हणून काही शेतकरी करंट सोडतात अन् त्या करंट मुळे देखील आजपर्यंत करंट सोडणाऱ्या शेतकऱ्यांसह कुटुंबातील तसेच इतरही शेतकरी जागच्या जागी गेलेत.. अशा अनेक घटना खरीप अन् रब्बी हंगामात होतात.. माझ्या जवळचा नातेवाईक स्वतः सोडलेल्या करंट मध्ये अडकून कायमचा गेला, मागे बायको अन् दिड वर्षांचं लेकरू, म्हातारे मायबाप राहिले..
अप्पासाहेब सदनाजी घीगे या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, बहिण अन् २ चिमुकले आहेत. या कुटुंबाला शासनाची तोकडी मदत मिळेलही मात्र कुटुंबातील कर्ताच त्यांच्या गेला आहे तो आता परत काळाच्या पडद्याआडून येणार नाही.. अपघात असता तर समजण्यासारखे आहे मात्र शॉक लागून मृत्यू हा प्रकार आता खूप वाढलेला आहे. दिवसभर उच्च दाबाने वीजपुरवठा होत नाही, दिवसाच्या लाईट मध्ये स्टार्टर उचलत नाही अन् मोटार सुरू होत नाही म्हणून रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पाणी पिकाला देण्यासाठी शेतात जावं लागतं.. तिथं वीज प्रवाह सुरू असलेल्या तुटलेल्या, लोंबकळत असलेल्या तारा, डुकरे, विषारी साप, हिंस्र प्राणी, डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी करंट लावलेल्या तारा प्रत्येक गावात शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी यमाच्या रूपाने सज्ज असतात..
सीमेवरच्या लढाया अन् शेती सारखीच झाली आहे.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अन् अपघाती जीव जाणं हे बॉर्डर वरच्या सैनिकांसारखे झालं आहे.. तिकडे शत्रूंच्या गोळ्या आपल्या सैनिकांना टिपण्यासाठी सज्ज असतात अन् इकडे आपल्याच गावच्या शेतात कष्टकरी किसान मृत्यूच्या छायेत असतो.. मध्यरात्री अन् पहाटे, सकाळी सकाळी येणाऱ्या फोनवर कुणाच्या तरी जीवाला धोका असण्याचेच संकेत अधिक असतात, तो फोन कुणीतरी आपल्यातून कायमच गेल्याचं सांगतो.. तो फोन कधी येऊ नये अशी माझी इच्छा असते पण टळणार कसा????
शासन, प्रशासन कुणालाही दोष देऊन उपयोग काय? गेलेले जीव अन् जाणारे जीव थांबण्यासाठी कुणीही काहीही करणार नाही.. अप्पासाहेब तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.. शेतकरी म्हणून जगणं सोप्पं नाही.. मरणं मात्र सोप्पं झालंय…😥😥
–
धनंजय गुंदेकर, बीड
09689043949