एका उसाला तब्बल 60 कांड्या; 50 गुंठ्यात घेतले 146 टन उत्पादन
●सविंदणे गावातील शेतकरी जयकुमार मोटे यांची किमया
शिरूर : योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर आणि एकात्मिक शेती पद्धतीने जयकुमार ज्ञानेश्वर मोटे रा. सविंदणे ता. शिरूर यांनी शेतीकडे विशेष लक्ष देऊन ५० गुंठे मध्ये तब्बल १४६ टन उत्पादन घेतले आहे. ऊसाला सुमारे ६० च्या जवळपास कांड्या लागले आहेत. मोटे यांनी आपल्या ५० गुंठे क्षेत्रात जून २०२३ मध्ये २६५ या वाणाच्या आडसाली ऊसाच्या कांड्याची चार फुटी सरी पद्धतीने लागवड केली.
मोटे यांच्या क्षेत्रातील ऊसाची नुकतीच तोडणी झाली आहे. ५० गुंठे क्षेत्रातील १४६ टन ऊस येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यात घातला आहे. एका ऊसाचे वजन जवळपास ६ ते ७ किलो आहे. लागवडी पूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर सरी फोडताना रासायनिक व सेंद्रीय खते यांचा भेसळ डोस दिला. दोन फवारणी ड्रोनद्वारे केल्या,असे मोटे यांनी सांगितले.